हजारो आत्महत्याग्रस्त बापांच्या लेकींच्या लग्नात आनंदाचे रंग भरणारा ‘फोटोग्राफर देवदूत’ – वैभव आखाडे

समाजात अनेक प्रकारची माणसं आपण पाहतो. कोणी यशाच्या मागे धावत असतो, कोणी प्रसिद्धीच्या झोतात जाण्यासाठी धडपड करत असतो, तर कोणी केवळ व्यवसाय म्हणून आपलं काम करत असतो. पण या सगळ्यांमध्ये एक फार दुर्मिळ वर्ग असतो – तो म्हणजे निःस्वार्थीपणे समाजासाठी काम करणाऱ्यांचा . या वर्गातील मोजक्या लोकांमध्ये एक नाव आज बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला ऐकायला मिळतं – वैभव आखाडे . वैभव आखाडे हा केवळ एक फोटोग्राफर नाही; तो समाजमन जपणारा, शेतकऱ्याच्या दुःखावर फुंकर घालणारा आणि मुलींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण कैद करणारा एक संवेदनशील कलाकार आहे. त्याने सुरु केलेली एक अनोखी आणि समाजासाठी प्रेरणादायी संकल्पना म्हणजे – "आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची फोटोग्राफी पूर्णपणे मोफत करणे." संकल्पनेचा उगम – एका मन हेलावणाऱ्या अनुभवातून वैभवचे बालपण बीड शहरातच गेले आणि घरात शिक्षण, शिस्त आणि संवेदनशीलतेचा वारसा मिळालेला. कॉलेजमध्ये असतानाच त्याला फोटोग्राफीचं वेड लागलं. अनेक लग्न, कार्यक्रम, समारंभ त्याने आपल्या कॅमेऱ्यात टिपायला सुरुवात केली. व्यवसाय बहरत होता, नावही होतं ह...